नवी दिल्ली – मतांसाठी विरोधकांची इंडिया आघाडी मुस्लिमांपुढे मुजरा करत असल्याचे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले. त्यावरून विरोधकांनी मोदींवर जोरदार पलटवार केला. मासे, मटन, मंगळसुत्रानंतर आता मुजरा या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. देशाच्या पंतप्रधानांना अशा प्रकाराची भाषा शोभत नाही, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षांच्या गोटातून देण्यात आल्या.
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशातील सभेत बोलताना मोदींच्या टीकेचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदींचे बिहारमधील भाषण ऐकले का? त्यांनी वापरलेले शब्द देशाच्या इतिहासातील इतर कुठल्याच पंतप्रधानांनी वापरलेले नाहीत, असे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही सोशल मीडियावरून मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानपद भुषवणाऱ्या व्यक्तीला अशा शब्दांचा वापर शोभत नाही, असे त्यांनी म्हटले. मोदींनी आतापर्यंत मासे, मटन, मंगळसुत्र, मुजरा यांसारखे शब्द वापरले असल्याचे राजदचे नेते मनोजकुमार झा यांनी म्हटले.
म या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांची एवढी भुरळ मोदींना का वाटते? मुस्लिम, मासे, मंगळसुत्र, मटन आणि आता मुजरा, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी सोशल मीडियावरून उपहासात्मक प्रतिक्रिया दिली.