8 ऐवजी 16 तास काम; ओव्हरटाइम 0 रु.; कीटनाशक विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कुचराई

वडगावशेरी – करोनाशी सामना करणाऱ्या महापालिका कीटनाशक विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अवघी 150 आहे, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना जादा काम करावे लागत आहे, त्यांच्याकडून 16 तासांपेक्षा अधिक वेळ काम प्रशासनाकडून करून घेतले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वाढीव कामाबाबत प्रशासनाकडून ओव्हरटाइम दिला जात नसल्याने आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याबाबत सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनीही दुजोरा दिला आहे.

महापालिका हद्दीत 11 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर समाविष्ट गावामध्ये कीटनाशकाची फवारणी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, केवळ दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत त्यांचे कंत्राट बंद करण्यात आले. परिणामी, 11 गावांत कीटनाशकाची फवारणी होत नसल्यामुळे समाविष्ट गावांमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे, असे स्थानिक नगरिकांचे म्हणणे आहे.

वास्तविक कीटनाशक विभागात कायम स्वरूपी कर्मचारी नेमणे गरजेचे होते. करोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी तरी भरती करणे गरजेचे होते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून या गावांसाठी एकही कायम स्वरूपी कर्मचारी नेमण्यात आलेला नाही.

तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला…
करोनाच्या काळात आणि आताही कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या धैर्याने काम केले. नगररोड विभागात करोना वाढत असतानाच या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन कीटनाशकाची फवारणी केली. यातून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला त्यानंतरही त्यांच्या वारसांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. राज्यभरातील अन्य माहापालिका त्यांच्या कर्मचाऱ्यांना भरघोस मदत करत असताना पुणे महानगरपालिका असा कारभार का करीत आहे? असा प्रश्‍न नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही पडला आहे.

आर्थिक वर्षात आरोग्य विभागाचा निधी संपलेला आहे. त्यामुळे या नेमणुका रखडल्या आहेत. महिन्याभरात याकरीता निधी उपलब्ध झाल्यावर कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल.
– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.