हृदयद्रावक ! मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्या वडिलांची डोक्यात गोळ्या घालून हत्या

पुन्हा एकदा हाथरस हळहळले

हाथरस: देशात उत्तर प्रदेश नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणामुळे संपुर्ण भारत हळहळला. त्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले गेले. आता त्यात हाथरसमध्ये पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्या वडिलांची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. याविषयीचा एक व्हिडियो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हाथरस जिल्ह्यातील सासनी क्षेत्रामध्ये असणाऱ्या नौजरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एका पित्याने मुलीची छेडछाड केली म्हणून पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार केली म्हणून 4 लोकांनी मुलीच्या वडिलांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अमरिश असे आहे.
1 मार्च रोजी मुलीच्या वडिलांवर चार लोकांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतू रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

रात्री उशिरा मुलीचे वडील शेतात बटाटे काढत होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांची मुलगी दवाखान्यात पोहोचली तेव्हा आपल्या वडीलांच्या मृत्यूची बातमी ऐकून तीला मोठा धक्का बसला.

दरम्यान, पोलिसांनकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिडीत मुलीने पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. संबंधित मुलीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बापाच्या मृत्युनंतर मुलीने हंबरडा फोडला. डीएसपी रुची गुप्ता या प्रकरणात कारवाई करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.