17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक
नवी दिल्ली :-महिला गटाची 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा रिकाम्या मैदानांवर होणार आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जाहीर केले आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही, असे स्पष्टीकरण महासंघाचे सचिव कुशल दास यांनी दिले आहे.
या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन देशातील अनेक राज्यांमध्ये होणार असले तरीही करोनामुळे सध्या प्रत्येक राज्यांत भिन्न नियम आहेत. त्याचा आढावा घेऊनच सामने कसे आयोजित करता येतील हे ठरवले जाणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी 17 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी क्रीडामंत्रालय व केंद्र व विविध राज्यांच्या सरकारकडे निवेदन देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी पुरुष गटाच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन भारताने केले होते त्यामुळेच जागतिक फुटबॉल महासंघाने याही स्पर्धेचे यजमानपद भारताला दिले. भारतात सध्या लॉकडाऊन आहे, तसेच परदेश विमान प्रवासावरही बंदी आहे. मात्र, येत्या 15 जुलैला ही बंदी मागे घेतली जाणार असल्याचे समजल्यावर या स्पर्धेबाबतच्या आमच्या आशा वाढल्या. आता स्पर्धेत सहभागी होत असलेल्या संघांना भारतात येणे सुकर होणार आहे. ही स्पर्धा देशातील नव्या गुणवत्तेला समोर आणणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.