सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन (एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए २५,०००डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने विजेतेपद संपादन केले.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सातव्या मानांकित यमलापल्लीने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा ६-४, ६-३ असा पराभव केला. हा सामना १ तास २४ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. चौथ्या गेम पर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे ४-४ अशी बरोबरी निर्माण झाली.
सहजाने दहाव्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-४ असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये सहजाने आक्रमक खेळ केला. चौथ्या गेममध्ये एकतेरिनाची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात ५-२ अशी आघाडी घेतली. एकतेरिनाने सहजाची सातव्या गेम मध्ये सर्व्हिस रोखली. पण पुढच्याच गेमला सहजाने एकतेरिना ची सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
Women’s ITF Precision Solapur Open : एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्लीची आगेकूच…
स्पर्धेतील विजेत्या यमलापल्लीला प्रिसिजन करंडक व 3,29,605 रुपये, तर उपविजेत्या मकारोवाला करंडक व 1,29,881 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
दुहेरीत हिरोमी आबे- साकी इमामुराला विजेतेपद
या स्पर्धेच्या दुहेरी गटाच्या अंतिम सामन्यात जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीचा ६-३, ६-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक आणि विजेत्यांना 1 लाख 19 हजार 217 रूपये आणि उपविजेत्यांना 59 हजार 677 रूपये अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिके वितरण इलीझियम क्लब लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरपवित सिंग, जमाश्री रिआल्टी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाने यांच्या हस्ते करण्यात आले.