सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन (एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए २५,०००डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी गटाच्या अंतिम सामन्यात जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीचा ६-३, ६-१ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक आणि विजेत्यांना 1 लाख 19 हजार 217 रूपये आणि उपविजेत्यांना 59 हजार 677 रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिके वितरण इलीझियम क्लब लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरपवित सिंग, जमाश्री रिआल्टी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
तर याच स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली हिने विजेतेपद संपादन केले. सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सातव्या मानांकित यमलापल्लीने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाचा ६-४, ६-३ असा पराभव केला. स्पर्धेतील विजेत्या यमलापल्लीला प्रिसिजन करंडक व 3,29,605 रुपये, तर उपविजेत्या मकारोवाला करंडक व 1,29,881 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.