राजगुरूनगर -महिलांना स्वतःच्या घरातूनच सन्मान मिळायला हवा आहे. घरात महिला सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी कुटुंबातील सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन खेड न्यायालयाच्या न्यायाधीश एन. एस. कदम यांनी राजगुरूनगर केले.
खेड बार असोशिएशनच्यावतीने महिलादिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 13) न्यायालयात महिला वकिलांच्या माध्यमातून महिला दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात न्यायाधीश कदम बोलत होत्या.
यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. ब्रह्मे, एम. एस. अंबळकर, एस. एन. पाटील, जी. बी. देशमुख, एस. एस. पाटील, पी. डी. देवरे, वकील बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष कड, उपाध्यक्ष ऍड. निलेश पवळे, ऍड. हर्षा पांडे, ऍड. आरती टाकळकर, ऍड. माया डांगले, ऍड. राणी सोनवणे, ऍड. संजय पानमंद यांच्यासह ज्येष्ठ विधितज्ज्ञ, वकील बार असोशिएशनचे पदाधिकारी, सदस्य पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात गेली 40 वर्षे खेड न्यायालयात वकिली करणाऱ्या आशा करमरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खेड न्यायालयात गेली अनेक वर्षांपासून वकिली करणाऱ्या इतर महिला वकिलांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून महिला वकील बार रूममध्ये सॅनेटरी नॅपकिन मशीन बसविण्यात आले.तर करोना व्हायरस आजाराची काळजी घेण्याचे वकील बार असोशिएशनच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.
ऍड. अनिल राक्षे, ऍड. सोनम नाईकरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर ऍड. साधना बाजारे, अर्चना किर्लोस्कर यांनी काव्यवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. आरती टाकळकर यांनी तर ऍड. माया डांगले यांनी आभार मानले.
सर्वच क्षेत्रात महिलांची दखल घेतली जात आहे. राज्यघटनेत महिलांसाठी विविध कायदे आले असून त्याची अंमलबजावणी होत आहे. निसर्गाने महिलांना अष्टधानी ही देणगी दिली आहे. पुरुषापेक्षा एकावेळी सात कामे ती जास्त करू शकते. विदेशी महिला आणि भारतीय महिला यांच्यात मोठी तुलना आहे. विदेशी महिला स्वतःसाठी काम करते. भारतीय महिला मात्र स्वतःबरोबर तिचे कुटुंब सांभाळण्याची दुहेरी भूमिका संभाळते.
– एन. के. ब्रह्मे,
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश