अकोले (प्रतिनिधी) – निळवंडे धरणाच्या कामासाठी मालवाहतूक करणाऱ्या डंपरची व जीपचा अपघात होवून महिला जागीच ठार झाली. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी (दि.28) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास रुंभोडी येथील कांदा व्यापारी बाबू नूरसा शेख हे आपल्या जीपद्वारे (क्र. एमएच- 17 एझेड- 52 42) अकोलेतून रुंभोडीकडे निघाले होते. जीप रुंभोडी फाटा येथील मातोश्री मंगलकार्यालयाजवळ आले असता तिचा टायर फुटला. त्याच वेळी समोरून येणाऱ्या डंपरवर (क्र. एमएच- 17- 4217) जावून ही जीप आदळली.
हा अपघात एवढा भीषण होता की, जीपमधील मुस्कान सोहेल शेख (वय 22) ही तरुणी जागीच मृत्युमुखी पडली. तसेच सोहेल शेख व जतीया शेख हे आई आणि मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अकोले पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.