वाघोली – वाघोली (ता. हवेली) येथील अर्चना श्याम शिरसाट या महिलेच्या वैद्यकीय उपचारकामी जयश्री राजेंद्र सातव पाटील, राजेंद्र सातव पाटील यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मदतीमुळे कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भाव काळात जीवनदान मिळाले आहे.
वाघोली येथे अल्प उत्पन्न गटात असणाऱ्या अर्चना शिरसाट यांना करोनाने ग्रासले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेची परिस्थिती पाहून कुटुंबियांना-नातेवाइकांना बोलावून घेण्याबाबत निरोप दिले होते. मात्र, याच कालावधीत अर्चना शिरसाट यांनी वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांना फोन करून आपली वैद्यकीय स्थिती सांगितली.
अर्चना शिरसाट या मैत्रिणीसाठी जयश्री सातव पाटील यांनी त्यांचे पती राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील व जावई मयूर आडसरे यांच्या मदतीने अद्ययावत रुग्णालयात त्यांना पुढील उपचारांसाठी दाखल केले आणि शिरसाट यांचे प्राण वाचवले. वाघोली व पुण्यातील दवाखान्यातील दोन्ही ठिकाणचा खर्च सातव पाटील यांनी दिला. अर्चना शिरसाट यांची तब्येत ठीक झाल्यानंतर जयश्री सातव पाटील यांनी त्यांचा वाढदिवस केक भरवून हॉस्पिटल मध्ये साजरा केला.