सोलापूर, – सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. एकूण 38 प्रभाग असून यातील 37 प्रभाग 3 सदस्यीय तर 1 प्रभाग दोन सदस्यांचा असेल. गेली अनेक दिवस विद्यमान नगरसेवक तसेच भावी नगरसेवक प्रभाग पुनर्रचनेची वाट पहात होते. आज हा आराखडा प्रसिद्ध झाला आहे.
प्रभाग रचना कोणत्या पक्षाला लाभदायक ठरेल याचे हेवेदावेही सुरु झाले आहेत. तर काही जणांनी तीन जणांचा प्रभाग आणि तो नागमोडी पध्दतीने तयार करण्यात आल्याने तो लांबलचक आहे. निवडणूकीच्या कालावधीत सदस्याला एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत पोहचणे अवघड होईल असे सांगण्यात येते आहे. जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करुन करण्यात आली आहे, असे पालिका आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
झालेले प्रभाग कोणाला लाभदायक किंवा कोणाला हानीकारक या राजकारणात पालिका प्रशासनाचा कितपत हातभार आहे, कोणी कोठे, कोणाचा दबाव आणला यापासून प्रभाग रचनेचे काटे कोणाच्या सत्तेच्या दिशेने फिरत आहेत या सारख्या अनेक राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे. येणाऱ्या हरकती शासनाकडे प्रशासन पाठविणार आहे.