पुणे : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानातून 1 लाख 10 हजारांचे सोने चोरणाऱ्या सराईत महिलेला गुन्हे शाखेने अटक केली. तिच्याकडून सोने जप्त करण्यात आले आहे. यापुर्वी तिच्याविरुद्ध 12 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, बिबवेवाडीत सराफाच्या दुकानातून चोरी करणारी सराईत महिला साठेनगरमध्ये राहत असल्याची माहिती पोलीस नाईक उत्तम तारु व मीतेश चोरमोले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने 1 लाख 10 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, नितीन शिंदे, यशवंत आंब्रे, अनिल उसुलकर, दीनेश गडांकुश, विशाल भिलारे, अजित फरांदे यांच्या पथकाने केली.