जयपुर: भाजपकडून आणखी आमदार फोडाफोडीचा प्रयत्न होऊ नये म्हणून राजस्थानातील कॉंग्रेस आमदारांना जैसलमेर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आमदार आत्तापर्यंत जयपुर- दिल्ली रस्त्यावरील एका हॉटेलात मुक्कामाला होते.13 जुलैपासून हे आमदार त्या हॉटेलात राहात होते. आज त्यांना जैसलमेरला हलवण्यापुर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांची एक बैठक घेतली.
पक्षात एकजूट राखण्याच आवाहन त्यांनी केले. त्याच वेळी सचिन पायलट यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना उद्देशून ते म्हणाले की, ज्यांनी भाजपकडून पैसे घेतले नाहीत त्या आमदारांना पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतण्याचा मार्ग खुला आहे. त्यांनी पक्षात परत यावे त्यांचे येथे स्वागतच केले जाईल.
येत्या पंधरा दिवसांत विधानसभेचे अधिवेशन होणार असून त्यासाठी राज्यपालांनी अनुमती दिली आहे. त्या अधिवेशनात सरकार विश्वासदर्शक ठराव मांडेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुचित केले. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आमदारांना पुन्हा मोठ्या पैशाचे प्रलोभन दाखवून फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.