पुणे : प्रभात रस्त्यावर ग्रीनपार्क निवास्थानावर एका ज्येष्ठ महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला. चोरी करण्याच्या उद्देशाने हा हल्ला पूर्वी काम करणाऱ्या वॉचमनने केला आहे.
याप्रकरणी योगीता प्रभाकर मोडक (70) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार सोमनाथ बंडू बनसोडे (48, रा.भुगाव) याला अटक करण्यात आली आहे. बनसोडे हा फिर्यादी यांच्या बाल्कनीतून आत येत होता. त्याला फिर्यादीने अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. यामध्ये फिर्यादीच्या डाव्या हाताला जखम झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला तीच्या पतीसमवेत येथे रहाते. त्यांचा ऍटो मोबाईल पार्टचा व्यवसाय आहे. एक मुलगा अमेरिकेत तर मुलगी पुण्यात रहाते. पाच वर्षापुर्वी हे दांम्पत्य अमेरिकेला गेल्यावर बनसोडेने त्यांच्या घरी चोरी केली होती. यामध्ये 7 ते 8 लाखाचे दागिने चोरले होते. मात्र तो मागील 8 ते दहा वर्षापासून तेथे कामाला असल्याने त्याच्यावर संशय आला नव्हता. आता त्याने पाच वर्षापूर्वी केलेल्या गुन्हयाचीही कबुली दिली आहे.
याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुर्यवंशी करत आहेत.