एकूण रुग्णसंख्या 22; उपचाराधीन 10
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी सायंकाळी एकजण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आणखी एका महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या चोवीस तासांत शहरातील करोना बाधितांची संख्या दोनने वाढली आहे. एकेकाळी करोना मुक्तीकडे निघालेले शहर पुन्हा एकदा करोनाच “हॉटस्पॉट’ बनू लागले आहे.
शहरात बुधवारी रात्री एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी एका महिला रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधितांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. त्यातील पहिले बारा रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. तर सध्या शहरातील दहा रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी (दि. 7) दिल्लीतून आलेल्या करोना बाधित तबलिगीच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या एका रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्या रुग्णावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्यांनाही रुग्णालयात दाखल केले आहे.
दाट वस्तीतील रुग्ण
दिल्लीतील तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावून परतलेले बहुतांश रुग्ण हे दाट लोकवस्तीमधील आहेत. करोना बाधित असलेले व त्यांच्या “हाय रिस्क क्वान्टॅक्ट’मध्ये आलेले व बाधित झालेले रुग्णही दाट लोकवस्तीमधील आहेत. या लोकांचा किती लोकांशी संपर्क आला, हे निश्चितपणे समोर येत नसल्यामुळे शहरातील विविध भागांत घबराटीचे वातावरण आहे.
40 संशयित “वायसीएम’मध्ये
गुरुवारी 40 संशयित रुग्णांना वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्या घशातील द्राव एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी 1 हजार 173 घरांना भेट देत 28 हजार 421 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. 1887 नागरिकांना होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.