मुंबई : कोरोनामुळे जगावर आलेले संकट पाहता 2019 ची मिस इंग्लंड भाषा मुखर्जीने मुकूट उतरवून मूळ व्यवसायात जाण्याचा निर्णय घेतला आहे. देश संकटात असताना ती पुन्हा एकदा डॉक्टरी पेशात परतली आहे. कोरोना व्हायरसविरोधात ब्रिटनच्या लढाईत ती एनएसएसमध्ये सामील झाली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, देशाला माझी गरज आहे हा विचार करुन रुग्णालयात परतण्याचा निर्णय घेतल्याचे भाषा मुखर्जीने सांगितले.
भाषा मुखर्जी मागील आठवड्यातच ब्रिटनला परतली. मिस इंग्लंड ठरल्यानंतर ती जगातील विविध ठिकाणच्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले की, “हा कठीण निर्णय नव्हता. मी आफ्रिका, तुर्कीला तसेच भारतातही गेले होते. भारतानंतर मला अनेक देशांचा दौरा करायचा होता. परंतु कोरोनामुळे मला माझा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. माझ्यासाठी रुग्णालय हे सर्वात चांगले ठिकाण असेल.”
भाषा मुखर्जीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन एनएचएस स्टाफचे आभार मानले. या संकटाच्या काळात लोकांनी घरातच राहावं असं आवाहन तिने केलं. ब्रिटनमध्ये सहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 55 हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.