पुणे -हिंजवडीच्या विप्रो कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजनअभावी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण तेथील जागरूक अधिकाऱ्यांनी पहाटेपर्यंत धावपळ करून ऑक्सिजन सिलिंडरची तरतूद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हा प्रकार त्या कोविड सेंटरमध्ये मंगळवारी रात्री उद्भवला होता.
ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशीही 60 रुग्ण ऑक्सिजनवर होते. रुग्णालयात ऑक्सिजनचे शंभर सिलिंडर उपलब्ध होते. त्यातील 50 सिलिंडर सोमवारी संपले आणि उर्वरित 50 सिलिंडर मंगळवारी संपल्यानंतर मंगळवारी रात्री आणीबाणीची स्थिती उद्भवली होती. ही बाब लक्षात येताच त्या केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धनराज परदेशी आणि त्यांचे दोन सहकारी डॉ. बालाजी लकडे आणि राहुल गौरकर यांनी त्वरित धावाधाव करून आजूबाजूच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर आणले.
डॉ. परदेशी यांच्याकडे पौड येथील ग्रामीण रुग्णालयाचाही कार्यभार असल्याने त्यांना तेथूनही सिलिंडर आणता आले. तेथून 10 सिलिंडर आणण्यात आले. औंधच्या रुग्णालयातून तसेच आसपासच्या खासगी रुग्णालयांतून मिळेल तितके सिलिडर्स गोळा करून मध्यरात्री तीनच्या सुमाराला या सिलिंडर्सची पूर्तता झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
सध्या या सेंटरमध्ये सुरळीत ऑक्सिजन साठा उपलब्ध झाला आहे.ऑक्सिजन उपलब्धतेकडे काटेकोर लक्ष दिले जात असल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आजही या सेंटरमध्ये 335 रुग्ण दाखल असून त्यातील 62 जण ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्या ऑक्सिजनची योग्य काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठांकडे माहिती पाठवण्यात आली आहे.