पुणे – शहरात करोनाच्या नव्या रुग्ण आढळण्याचा आलेख उतरण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी दिवसभरात 3,991 नवे बाधित आढळले आहेत. तर, करोनामुक्त होणाऱ्यांचा आकडाही वाढत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरातील एकूण बाधितांची संख्या शनिवारी 3 लाख 95 हजार 440 झाली. तर, दिवसभरात 4 हजार 789 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे करोनामुक्तांचा आकडा 3 लाख 39 हजार 571 वर गेला आहे. तर शनिवारी दिवसभरात 74 मृत्यू झाले असून 19 जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील करोनामृतांचा एकूण आकडा 6 हजार 443 झाला आहे.
50 टक्के पुणेकरांच्या चाचण्या
शहरातील करोनाच्या चाचण्यांनी 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी दिवसभरात 22 हजार 274 जणांच्या चाचण्या करण्यात आलेल्या असून गेल्या वर्षभरातील एकूण चाचण्यांचा आकडा 20 लाख 13 हजार 703 वर गेला आहे. एकूण शहराची लोकसंख्या विचारात घेता आतापर्यंत वर्षभरात तब्बल 50 टक्के पुणेकरांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.