पिंपरी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्रात बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीमध्ये शरद पवार यांनी कन्या सुप्रिया सुळे आणि शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे.
याठिकाणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का देत मागील निवडणुकीत अपेक्षित अमोल कोल्हे यांनी विजय नोंदविला. आता आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्ष पद दिल्यानं शिरुर मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
यापूर्वी शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्हीही पक्षात उभी फूट पडली आहे. त्यातच विद्यमान खासदार राष्ट्रवादीचा असल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गटाने शिरूर लोकसभेवर आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचादावा केला आहे.
त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिले असतानाही त्यांनी आपण शिरूरच्या मैदानात राहणारच असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे वक्तव्य केले आहे.
अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्ये ही चीतपट करण्यासाठी शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याची चर्चा सुरू असताना भोसरीचे एक माजी आमदार नेहमीप्रमाणे शिरूरसाठी इच्छुक आहेत.
दोन विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर न लढणारे मात्र अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आणि मी शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. तर विद्यमान खासदार शिवपुत्र संभाजी महानाट्य भोसरी गावजत्रा मैदानात भरवून लोकसभेचा छुपा प्रचार करत आहेत.
महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा याबाबत समोर येईल.
सध्या तरी शिरूर लोकसभेत शरद पवार गटातून अमोल कोल्हे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रबळ इच्छुक आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मावळ व शिरूर लोकसभेच्या जागेसाठी आदलाबदल झाली तर चित्र बदलणार आहे, अशी चर्चाही मतदारसंघात सुरू आहे.
अजित पवार गटाचा उमेदवार कोण?
शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शिवाजीराव आढळराव-पाटील याच्याकडे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
मात्र, पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांची भुमिका बदलल्याचे दिसून आले आहे. तर अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या शिरूर लोकसभेतील ये0जा वाढली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा लोकसभेसाठी उमेदवार कोण असू शकते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.