लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा रेल्वे स्थानकावरून ११.३० वाजता सुटणारी लोकल अचानक तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्याने तिकीट काढून रेल्वे स्थानकावर थांबलेल्या प्रवाश्यांचे मोठे हाल झाले.
मागील काही दिवसांपासून रविवारी अनेक लोकल गाड्या व काही मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जात आहेत. आज मात्र याबाबत स्पष्टता नसल्याने ११.३० च्या लोकलने जाणाऱ्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर तिकीट काढले होते.
तिकीट देणाऱयां रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील याबाबत माहिती नसल्याने त्यांनी देखील तिकिटे वाटप केली. प्रवाशी रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत असताना ११.३० वाजता अचानक ही लोकल तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली असल्याची घोषणा झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. याबाबत काही तांत्रिक कारणामुळे ही लोकल रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.