पुणे – महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभांचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता. आता महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी शिंदे सरकारवर त्याच मैदानातून हल्लाबोल करणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात, बारसू ऑइल रिफायनरीबाबत राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद कोणाकडे याबाबत तिन्ही पक्षाचे नेते करत असलेली वक्तव्यं व बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं मोठं यश हे मुद्दे चर्चिले जातायेत. आजच्या सभेतून महाविकास आघाडीचे नेते याबाबत काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे…
बारसूवर एकमत होणार?
बारसू ऑइल रिफायनरीला ठाकरे गटाने जोरदार विरोध केला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत सामंजस्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. यामुळे महाविकास आघाडी म्हणून बारसू ऑइल रिफायनरीबाबत महाविकास आघाडीत एकमत होणार का? आजच्या सभेतून बारसूबाबत कार्यकर्त्यांना काय संदेश दिला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…
मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत चुरस?
मुख्यमंत्रीपदावरून बिनसल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत काडीमोड घेतला होता. मात्र आता मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत देखील चुरस निर्माण झाली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात येतायेत तर दुसरीकडे काँग्रेसनेही ज्याचे जास्त आमदार त्याला मुख्यमंत्रीपद अशी भूमिका घेतली आहे.
ठाकरे गटाने मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत. अशात, ठाकरे गटाकडून याबाबत काही भूमिका मांडली जाते का? यावर राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते नव्याने काही भूमिका मांडतात का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश
नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने मोठं यश संपादित केलंय. मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, मंत्री तानाजी सावंत, आमदार संजय गायकवाड या ठाकरेंचं नेतृत्व नाकारून शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या शिवसेना नेत्यांना बाजार समितीत फटका बसलाय, याबाबत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मंचावरून काय भूमिका मांडतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
सभेमध्ये कोणकोण बोलणार?
नागपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाषण केले नव्हते. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र असे काही झाले नाही. नागपूरच्या सभेत अजित पवार यांनी मंचावर हजेरी लावली असली तरी त्यांनी तेथे भाषण करणे टाळले होते. अशातच आता आज मुंबईच्या वज्रमूठ सभेत अजित पवार बोलणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
खुर्च्या समान?
महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी खुर्ची देण्यात आली होती. यावरून महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं गेलं. नागपुरात मात्र सर्वांना समान खुर्च्या मिळाल्या. मुंबईच्या सभेत खुर्च्या सामान देण्यात येणार का याकडेही लक्ष असेल.