मुंबई -जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडल्यावर भारतीय संघ लगेचच मोठ्या दौऱ्याची तयारी करणार आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार असून, या मालिकेतील सर्व सामने केवळ जिओ सिनेमावर चाहत्यांना मोफत पाहता येणार आहेत. या दौऱ्याचे संभाव्य वेळापत्रक हाती आले असून, याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच बीसीसीआयकडून करण्यात येणार आहे.
ही मालिका येत्या 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. ही मालिका डीडी स्पोर्टसवरदेखील पाहता येणार आहे. गेल्या वेळीदेखील भारताने वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. त्यावेळी त्या दौऱ्यातील सामने हे डीडी स्पोर्टसवर दाखवण्यात आले होते. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून,
मुख्य भारतीय संघाला जवळपास एक महिना विश्रांती मिळणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्याची तारीख बीसीसीआयकडून अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरीही या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना हा 12 जुलैला सुरू होईल. तर मालिकेतील अखेरचा टी-20 सामना हा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवला जाईल.
अमेरिकेत आयसीसी क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी वेस्ट इंडीजसह त्यांनाही विश्वकरंडक टी-20 स्पर्धेतील काही सामन्यांचे आयोजकत्व देण्यास तयार आहे. मात्र, तोपर्यंत क्रिकेटचे सामने खेळवले जावेत अशी मैदाने व सुविधा त्यांना निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यामुळेच वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाचे काही सामने फ्लोरिडात खेळवण्यावर आयसीसी भर देत आहे.
भारत-वेस्ट इंडीज मालिकेचे संभाव्य वेळापत्रक-
पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलै, डॉमिनिका
दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलै, त्रिनिदाद
पहिला एकदिवसीय सामना 27 जुलै, बार्बाडोस
दुसरा एकदिवसीय सामना 29 जुलै, बार्बाडोस
तिसरा एकदिवसीय सामना 1 ऑगस्ट, त्रिनिदाद
पहिला टी-20 सामना 4 ऑगस्ट, त्रिनिदाद
दुसरा टी-20 सामना, 6 गयाना
तिसरा टी-20 सामना, 8 गयाना
चौथा टी-20 सामना, 12 फ्लोरिडा
पाचवा टी-20 सामना, 13 फ्लोरिडा