लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता वर्षभरापेक्षा कमी कालावधी बाकी असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. याचे संकेत ज्याप्रकारे विविध राजकीय पक्षांनी आपल्या पक्ष संघटनेत बदल करायला सुरुवात केले त्यावरून मिळू लागले आहेत. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेस पक्षाने आपल्या मुंबई संघटनेतील भाकरी फिरवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या स्थापनादिना दिवशी पक्षामध्ये कार्यकारी अध्यक्ष ही दोन पदे निर्माण करून भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेले भाजप आणि शिवसेना यांच्या सरकारमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून त्यावेळीसुद्धा काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन आमदारांना संधी देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेसुद्धा आगामी कालावधीमध्ये मेळाव्यांचे आयोजन केले आहे. दुसरीकडे, तेलंगणाचे मुख्यमंत्री असलेले केसीआर यांनीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले असून गेल्या काही कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातही सभा घेतल्या आहेत. एवढेच नव्हे तर जिल्हा पातळीवर त्यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची संघटना निर्माण करण्याचे नियोजनही केले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आगामी वर्षभराच्या कालावधीतील निवडणुका लक्षात ठेवून नियोजन सुरू केले असले, तरी सर्वात चर्चेची गोष्ट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामधील फेरबदल हीच ठरली आहे. गेल्या महिन्यामध्ये शरद पवार यांनी अचानक एका कार्यक्रमात बोलत असताना मी आता निवृत्ती घेत आहे, अशी घोषणा केली होती. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करून शरद पवार यांना तो निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. पण त्यानंतर महिन्याभराच्या कालावधीतच पक्षाच्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून शरद पवार यांनी दोन कार्यकारी अध्यक्ष निर्माण करून ही दोन पदे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना दिली आहेत. सध्या प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची जबाबदारी नसल्याने ही खास पदे निर्माण करून त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचा खुलासा शरद पवार यांनी नंतर पत्रकार परिषदेत बोलताना केला. जयंत पाटील किंवा अजित पवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडे सध्या कोणती ना कोणती महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळेच ज्यांच्याकडे कोणतीच जबाबदारी नाही अशा नेत्यांकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा लक्षणीय कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने काहीतरी हालचाली करणे अपेक्षितच होते. त्याच दिशेने या हालचाली सुरू आहेत आणि सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्या राज्यात थोडेफार का होईना अस्तित्व आहे त्या राज्यांची जबाबदारीसुद्धा या दोन कार्यकारी अध्यक्षांना वाटून देण्यात आली आहे. अर्थात, महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडेच देण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा देण्याची घोषणा केली होती तेव्हा अनेक नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनवणी करत असताना अजित पवार यांनी मात्र शरद पवार यांचा हा निर्णय स्वीकारला होता आणि त्या निर्णयाचा आदर करावा, अशी सूचनाही त्याचवेळी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील या बदलांकडे पहावे लागणार आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि मुरब्बी नेत्याने विचारपूर्वकच हा निर्णय घेतला असावा, यात कोणतीही शंका नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांना मानणारा मोठा नेतावर्ग आणि कार्यकर्ता वर्ग आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा सर्व ठिकाणी वावरणारा आणि सर्वांशी चांगले संबंध ठेवणारा नेताही पक्षासाठी महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल हे सध्या केंद्रीय राजकारणातच कार्यरत आहेत. साहजिकच आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करूनच त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली असावी. अर्थात, सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. वर्षभरात होणारी लोकसभा निवडणूक किंवा त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक यासाठी सुप्रिया सुळे यांची नियुक्ती महत्त्वाची मानावी लागेल. शरद पवार यांनी जेव्हा राजीनाम्याची घोषणा केली होती तेव्हा अनेक नेत्यांनी पवार यांनी अध्यक्षपदावरच राहावे आणि कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करावे, अशी सूचना केली होती. त्या सूचनेची दखल घेऊनच शरद पवार यांनी ही भाकरी फिरवण्यास सुरुवात केली आहे, असे दिसते. सध्याचे कार्यकारी अध्यक्ष आहेत तेच भविष्यकाळात पक्षाचे अध्यक्ष होतील असे नाही, असेही शरद पवार यांनी सुचित केले आहे. सर्वांना विचारून सर्व संमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचा खुलासा शरद पवार यांनी केला असल्याने अजित पवार नाराज आहेत किंवा नाही हा विषय येत्या काही दिवसांत संपुष्टात येऊ शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अशा प्रकारचे फेरबदल होत असताना मुंबई पक्ष संघटनेमध्ये कॉंग्रेसनेही बदल केले असून भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेमध्ये सध्या कोणतेही चैतन्य दिसत नसल्यानेच हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात, काही महिन्यांपूर्वी जेव्हा भाई जगताप यांना मुंबई अध्यक्षपदावर बसवण्यात आले होते तेव्हासुद्धा कॉंग्रेसतर्फे अशाच प्रकारचा खुलासा करण्यात आला होता. नजीकच्या कालावधीमध्ये कधीही मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने आणि मुंबईमध्ये महापालिका निवडणूक पातळीवर कॉंग्रेसची बऱ्यापैकी ताकद असल्याने हे फेरबदल करावे लागले आहेत. थोडक्यात, सर्वच राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने फेरबदल करून आपली तयारी दाखवून दिली आहे, हाच याचा अर्थ. इतर पक्षांमधील घडामोडी नजीकच्या कालावधीमध्ये समोर येतील आणि त्यानिमित्ताने त्यांची तयारीही दिसेल.