हरियाणा -प्रख्यात कुस्तीपटू व खुनाच्या आरोपात सध्या तुरुंगात असलेल्या सुशीलकुमारच्या कुटुंबीयांकडून मयत कुस्तीपटू सागर धनखड याच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात आहेत. सागरचे वडील अशोक व त्याची आई सविता यांना तडजोड करा, असे सांगत पोलिसांच्या गणवेशात काही व्यक्ती दोन दिवसांपूर्वी सागरच्या घरात घुसले होते व त्यांना धमकावले होते.
ही तक्रार सागरच्याच कुटुंबीयांनी केली आहे. सागरच्या हत्येप्रकरणी ऑलिंपिकपटू कुस्तीगीर सुशील सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याला वाचविण्यासाठीच हे सर्व केले जात आहे. 4 मे 2021 सालच्या रात्री सुशीलकुमार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर पोहोचला होता.
त्याने झालेल्या वादावादीनंतर सुशील व त्याच्या सहकारी खेळाडूंनी सागरला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयात सागरचा मृत्यू झाला. 17 दिवसांनंतर 23 मे रोजी सुशीलकुमारला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती.
आता त्याला जामीन मिळाला असल्याने तो सागरच्या कुटुंबीयांवर विविध प्रकारे दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळेच आम्ही सातत्याने पोलीस सुरक्षेची मागणी करत असल्याचे सागरच्या वडीलांनी म्हटले आहे.
अद्याप सुरक्षा पुरविलेली नाही
न्यायालयात सुनावणीच्या वेळी अशाच धमक्या दिल्या जातात. त्यामुळे अनेक वेळा सुरक्षेची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी सागरच्या कुटुंबाला अद्याप सुरक्षा पुरवलेली नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशीही संपर्क साधल्याचे सागरच्या वडिलांनी सांगितले. मात्र, तरीही अद्याप आम्हाला सुरक्षा पुरवण्यात आलेली नसून संपूर्ण कुटुंब भीतीच्या सावटाखाली राहात आहे, असेही ते म्हणाले.