“रखडलेली रुग्णालये’ वृत्तमालिका पाठपुरावा : किफायतशीर पर्याय निवडणार
पिंपरी – महापालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या पाच रुग्णालयांबाबत धोरण ठरविण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयांसाठी आकृतीबंध, चालविण्यासाठी लागणारा खर्च, त्याची व्यवहार्यता तपासून ही रुग्णालये महापालिकेने स्वत: चालवायची की खासगी संस्थेमार्फत याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. सर्वसाधारण सभेसमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
महापालिकेच्या वतीने भोसरी रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्याप तिथे रुग्णालय सुरू झालेले नाही. पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामही पूर्ण झालेले आहे. येथील मैलाशुद्धीकरण केंद्राचे काम सध्या सुरू आहे. रुग्णालय इमारतीचे तत्कालीन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते सप्टेंबर-2019 मध्ये उद्घाटन करण्यात आले. मात्र, अद्याप संबंधित इमारतीत रुग्णालय सुरू झालेले नाही.
मासूळकर कॉलनी येथील नागरी आरोग्य केंद्र आणि नेत्र रुग्णालयाचे काम मुदत होऊन सव्वा वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप अपूर्ण आहे. थेरगाव-बापूजीबुवानगर येथे रुग्णालय इमारत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. रुग्णालय इमारतीतील विद्युतविषयक आणि फ्लोअरिंगची कामे पूर्ण होण्यासाठी मे महिना उजाडणार आहे. आकुर्डी येथील रुग्णालयाचे काम मुदत पूर्ण होऊन सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर अपूर्ण आहे. या सर्व रुग्णालयांच्या सद्य:स्थितीवर प्रकाशझोत टाकणारी “रखडलेली रुग्णालये’ ही विशेष वृत्तमालिका दैनिक “प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली.
लवकरच बाह्यरुग्ण विभाग सुरु होणार
भोसरी आणि जिजामाता रुग्णालयाच्या नवीन इमारतीत लवकरच बाह्यरूग्ण विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. अन्य रुग्णालयांची कामे सध्या सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित रुग्णालये महापालिकेने स्वत: चालवायची की खासगी संस्थांमार्फत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल. संबंधित रुग्णालयांसाठी आकृतीबंध तयार करणे, ही रुग्णालये वायसीएममधील पदव्युत्तर संस्थेच्या धर्तीवर चालवायची का?, रुग्णालये चालविण्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी आवश्यक किफायतशीर पर्याय काय? आदी बाबींचा सविस्तर विचार केला जाणार आहे.