नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार असून प्राथमिक फेऱ्यांमधून आलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये मोठी मुसंडी मारली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, शिवसेनेला अपेक्षित यश मिळत नसल्याचे या फेऱ्यांमध्ये दिसतआहे. यामुळे आता राज्यात राजकारणाला वेगळा रंग चढताना दिसत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या निकालांवरून थेट संजय राऊत आणि शिवसेनेवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार असून प्राथमिक मतमोजणी फेऱ्यांमधून भाजपाची आगेकूच झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील भाजपाने मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच केली असून शिवसेनेला खाते उघडण्यात अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टॅग करून ट्विटरवर निशाणा साधला आहे.
सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौर्यांचा परीणाम-
शिवसेनेच्या गोवा युपी सगळ्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होतांना दिसत आहे….झुकेगा नही ….जब तक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ़ नहीं करतां –
इति सर्वज्ञानी@rautsanjay61 @Dev_Fadnavis #ElectionResults2022— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 10, 2022
“सर्वज्ञानींच्या झंझावाती प्रचारदौऱ्यांचा परिणाम…शिवसेनेच्या गोवा, युपीमधल्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नहीं..जबतक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ नहीं करता – इति सर्वज्ञानी”, असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना देखील टॅग केले आहे.
शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये उमेदवार उभे केले होते. उत्तर प्रदेशमध्ये २२ ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार उभे केले होते. मात्र, पहिल्या मतमोजणी फेऱ्यांमध्ये शिवसेना उमेदवारांच्या वाट्याला अद्याप यश आलेले नाही.