बळीराजाचा प्राणांतिक आकांत अन्‌ अयोध्येचा जल्लोष

नवी दिल्ली : केवळ 2016 या एका वर्षात देशात एक दोन नव्हे तर 11 हजार 379 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे 948 जण प्रतिमहिना किंवा 31 जण प्रतिदीन आपली जीवन यात्रा संपवत होते. याबाबत नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल शुक्रवारी म्हणजे आयोध्या निकालाच्या आदल्या दिवशी प्रसिध्द झाला. त्यात एकच बाब यंदा वगळण्यात आली होती… या आत्महत्येची कारणे… ही महत्वाची घडामोड म्हणजेच शेतकऱ्यांचा प्राणांतिक आकांत अयोध्या निर्णयाच्या जल्लोषात विरला गेला… बळीराजाने ज्या अबोलपणे स्वत:ला संपवले त्याच शांतपणे त्याच्या मृत्यूची कारणेही दाबण्यात आली.

या अहवालनुसार स्वत:च्या आयुष्याला फास लावून घेणाऱ्या शेतकऱ्यांत सर्वाधिक जण महाराष्ट्रातील आहे. 2015च्या तुलनेत 2016 मध्ये ही संख्या 20 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. हा अहवाल या पुर्वी 21 ऑक्‍टोबरला जाहीर केला जाणार होता. अर्थात त्यादिवशी महाराष्ट्रात निवडणुका होत्या हा केवळ योगायोग… 2016 मध्ये शेतकऱ्यांच्या देशातील एकूण आत्महत्या 21 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे हा अहवाल सांगतो. पण त्याचवेळी शेतमजुरांच्या आत्महत्या 10 टक्‍क्‍यांनी वाढल्या.

या अहवालात यापुर्वी शेतीचा ताण, पिकांचे अपयश, कर्ज, कौटुंबिक समस्या, आजारपण अशी वर्गवारी असे. त्यातून शेतकऱ्यांच्या सामाजिक -आर्थिक समस्या जमीनीवरील ताबा अशा अनेक गोष्टींवर प्रकाशझोत पडत असे. याबाबत या प्रक्रियेत सहभागी झालेल्या एका माजी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की जुन्या सर्व वर्गवारीसह उपवर्गवारी केल्या होत्या. मात्र, अहवालात त्यांचा समावेश नसणे आश्‍चर्यकारक आहे.

यापुर्वीच्या अहवालात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे स्वतंत्र प्रकरण असयाचे. यंदा मात्र त्यांचा समावेश व्यवसायानुरूप आत्महत्या या प्रकरणात केला आहे.2015च्या अहवालात कृषीक्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या आत्महत्या असे प्रकरण होते. त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारणांप्रमाणे सहा विभागात वर्गीकरण केले होते.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा अहवाल गृहमंत्रालयाला तब्बल दीड वर्षापुर्वी देण्यात आला होता. त्यावर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यरोला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची माहिती संकलीत करणे आवश्‍यक आहे का? अशी महत्वाची शंकाही त्यात दडली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)