साताऱ्यात युवकावर तलवारीने हल्ला

दोघांवर संशय : डोक्यात, पोटावर गंभीर वार

सातारा : पूर्वी झालेल्या वादातून ऋषीकेश किरण गोसावी (वय ३०, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) याच्यावर दोघाजणांनी तलवारीने वार केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास व्यंकटपुरा पेठेत घडली. यामध्ये ऋषीकेश गंभीर जखमी झाला असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋषीकेश गोसावी हा व्यंकटपुरा पेठेमध्ये शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मित्रांसमवेत बोलत उभा राहिला होता. यावेळी दोन युवक तेथे आले. त्या युवकांनी ऋषीकेशवर तलवारीने हल्ला केला.

डोके, पोट आणि गळ्यावर त्याच्या वार करण्यात आले आहेत. पोटात तलवार खुपसल्यामुळे त्याची आतडी बाहेर आल्याचे पोलिसांनी सांगितले. ऋषीकेशची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ऋषीकेशवर हल्ला झाल्याचे समजताच व्यंकटपुरा पेठेतील युवकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर गर्दी केली होती. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमका कोणत्या कारणातून ऋषीकेशवर हल्ला झाला, हे समोर आले नसून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.