बाळासाहेब आज हवे होते… असे का म्हणाले राज ठाकरे ?

मुंबई : आज बाळासाहेब हवे होते… बाबरी मशिद – रामजन्मभूमी निकालावर राज ठाकरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया… अनेक जुने जाणते शिवसैनिक ही प्रतिक्रिया ऐकून हेलावले. याला कारण ही तसेच होते. बाबरी पतनानंतर कारसेवकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रतिक्रिया येत असताना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांनीच कारसेवकांच्या बाजूने आवाज देत शिवसेनेचे हिंदुत्वाचे नाणे खणखणीत वाजवले होते.

बाबरी मशिद पाडल्यानंतर त्यावेळी राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सर्वच नेत्यांनी शिवसैनिकांनी बाबरी पाडली असे सांगत स्वत:ची कातडी वाचवण्याच प्रयत्न केला. शिवसेनेला यात गुंतवून आपली सौम्य राजकारणी असल्याची भूमिका या नेत्यांना आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी वापरायची होती. त्यामुळे राममंदिराबाबत आज कोणीही श्रेयवादाची लढाई लढली तरी कारसेवकांची मने या नेत्यांनी काहीशी दुखावली होती.

बौध्दीकात करायची भाषा आणि प्रत्यक्षात माध्यमांपुढे करायची भाषा यातील फरक त्यांना त्रस्त करत होता. त्यावेळी एकच आवाज महाराष्ट्रातून निघाला. तो होता बाळासाहेब ठाकरे यांचा. सामनाचा दुसऱ्या दिवशीचा मथळा होता… होय बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे… हा इतिहास फार कमी जणांना लक्षात असेल. हे अचुक लक्षात ठेवणाऱ्या राज ठाकरे यांनी प्रतिक्रियेची अचुक वेळ साधत शिवसैनिकांच्या मनाला साद घातली.

राज यांच्या प्रतिक्रियेनंतर त्याकाळाती सामनाचे मथळे आणि नवाकाळमधील अग्रलेखांची आठवणही अनेक जाणत्या लोकांनी काढली. राज यांनी या लोकांच्या मनाला आपल्या प्रतिक्रियेतून साद घातली असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.