मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला आयोगाने दिले. त्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्यात या घडामोडी घडत असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतरआज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत “आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यालये ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे.” असे म्हटले.
पुढे बोलताना भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्याविषयी बोलताना, संजय राऊत यांची बडबड ही आता आम्हे कार्यकर्तेच बंद करतील असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह यांच्याविषयी डील झाल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यावरच गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.