जम्मू -भारतीय स्टेट बँकेकडून (एसबीआय) निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांचा तपशील प्राप्त झाला आहे. आयोग तो तपशील वेळेत उघड करेल, अशी ग्वाही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी दिली. जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असणारे कुमार पत्रकारांशी बोलत होते.
दिल्लीला परतल्यानंतर निवडणूक रोख्यांचा तपशील वेळेत उघड करण्याची निश्चिती मी करेन, असे त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे एसबीआयने मंगळवारी सायंकाळी निवडणूक रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केला.
तो उघड करण्यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ मार्चच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. आयोगाला संबंधित तपशील आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करावा लागणार आहे. त्या तपशिलात राजकीय देणगीदारांच्या नावांचा समावेश आहे.
ते देणगीदार कोण आहेत याविषयी मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष निवडणूक आयोगाकडे असेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उघड होणारा तपशील राजकारण ढवळून काढणारा ठरण्याची शक्यता आहे.