वाहनगाव हद्दीत रानडुकरासाठी लावलेल्या फाश्यात कुत्रा अडकला
वडगाव मावळ – आंदर मावळातील वाहनगाव हद्दीतील वनक्षेत्रात रानडुक्करासाठी लावलेल्या फाश्यात कुत्रा अडकला. ही घटना शनिवारी (दि. 2) रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे वनक्षेत्राच्या हद्दीत खुलेआम शिकारी सुरू असल्याची चर्चा रंगत होती.
लॉकडाऊन असल्याने घरात राहून कंटाळले शिकारी शिकार करण्यासाठी जात आहेत. त्यात शिकारीसाठी वनक्षेत्रात आगी लावून वन्यजीव व वने नष्ट करण्याच्या घटना घडल्या जात आहेत.
मावळ ऍडव्हेंचररचे संस्थापक विश्वनाथ जावलीकर यांनी शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील यांच्याकडे शिकारी होत असल्याची तक्रार केली होती. शनिवारी (दि. 2) वनक्षेत्रात कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून मावळ ऍडव्हेंचरर चंदू खांडभोर तसेच त्यांचे सहकारी त्या ठिकाणी पोहचले. त्या कुत्र्याने अनेक वेळा फश्यातून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केल्याने कंबरेला जखम झाली. खांडभोर त्याच्या सहकाऱ्यांनी त्या कुत्र्याची त्या फश्यातून सुखरूप सुटका करण्यात यशस्वी झाले. त्या कुत्र्याला पाणी व खाऊ दिला. त्या कुत्र्याला जीवदान दिले.
वनविभागाचा ढिसाळ कारभार समोर आल्याने वन्यजीव व वने संरक्षण व संवर्धनाबाबत उदासीनता दिसत आहे. वन विभागाने जाळपट्टे ओढले नसून, वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्याने वन्यजीव नागरी वस्तीत घुसत आहेत. वन्यजीवांची शिकार रोखण्याची मागणी प्राणीमित्र करत आहेत.
आंदर मावळात होणाऱ्या शिकऱ्यांवर करडी नजर असून, त्याबाबत माहिती दिल्यावर कारवाई करता येईल. वनपरिक्षेत्र त्या गावचे असून ग्रामस्थांनी सतर्क राहिल्यावर शिकारी रोखता येतील.
– महेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरोता.