Washim – समाजात हुंडाबळीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आजही काही ठिकाणी मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. अशीच एक दुर्दैवी घटना वाशिम जिल्ह्यातील वाघजाळी गावात घडली आहे. मेघा शिंदे या नवविवाहितेची हुंड्यासाठी तिच्याच पतीने गळा चिरून हत्या केलाचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
काही महिन्याअगोदर वाशिम जिल्ह्यातील चिखली बु. गावातील मेघा शिंदे या तरुणीचा विवाह वाघजाळी येथील गजानन शिंदे या तरुणाशी झाला होता. मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मेघाच्या माहेरून चारचाकी गाडीसाठी पैसे आणण्यासाठी पतीने तगादा लावला. तसेच मेघाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
त्यानंतर मेघा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांमध्ये कायम वाद होत राहिला. मेघा ही आपल्या पती, सासू, सासऱ्यासह शेतात गेली असता तिथ पुन्हा त्यांच्यात पैशांवरून वाद झाला.
सासू, सासरे आणि पती यांनी मिळून मेघाची गळा चिरत हत्या केल्याची माहिती मिळत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पती गजानन शिंदे याने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सध्या त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी मेघाच्या माहेरच्या कुटुंबीयांनी वाशीम ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली असून या प्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता इंगोले करत आहेत.