हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी का करतात, अजून कळेना; नाना पटोलेंची भाजपला कोपरखळी

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले असून पहिल्याच दिवशी वैधानिक मंडळावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कोपरखळी मारली. आणि पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी ताज्या झाल्या.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही?  उपमुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबर २०२० ला संध्याकाळी ४.१५ वाजता विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली होती. त्या घोषणेला आज ७२ दिवस झाले. पुरवणी मागणीच्या संदर्भात अजित पवारांनी सांगावं की विकासाचा समतोल साधलेला आहे. म्हणजे मग आज रात्री बसून आम्ही ती सगळी आकडेवारी टॅली करून बघू की खरंच विकास झाला आहे किंवा नाही. आणि नसेलच, तर तसं तरी सांगावं. म्हणजे ती आकडेवारी टॅली करण्याची गरजच पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली. 

मुनगंटीवारांच्या रात्रीच्या वक्तव्याचा संदर्भ घेत नाना पटोले म्हणाले कि, हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. ते तसं का करतात, मला अजून कळलं नाही. असे म्हणताच सभागृहात काहीसा हशा पिकला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.