लहान मुलांच्या शाळेचे अस्तित्व धोक्‍यात

पैशाविना कारभार सांभाळणे कठीण

पिंपळे निलख – करोना संसर्गजन्य आजारामुळे मागील वर्षापासून बंद असलेल्या लहान मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. बहुतांश शाळांना स्वतःची जागा नाही. भाडेतत्त्वावर जागा घेऊन सुरू केलेल्या शाळांना आता भाडे देणे कठीण झाल्याने बऱ्याच शाळा विक्रीसाठी तसेच बंद करण्याच्या भूमिकेत संस्थाचालक आहेत.

सध्या महाराष्ट्रात व पिंपरी-चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शासनाने सुरू केल्या होत्या परंतु त्यादेखील आता बंद करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गजन्य रोग असल्याने लहान मुलांना कोणतेच पालक शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत. तसेच शासनदेखील शाळा सुरू करण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे खासगी संस्थाचालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

आजकाल शाळेत लहान मुलांना वय वर्षे तीनपासूनच छोट्या इंग्रजी व इतर माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल दिसून येत आहे. पालकांमध्ये जर आईवडील दोघे नोकरीला असल्यास आपल्या मुलाला पाळणाघर तसेच ज्युनिअर, सिनिअर केजी व इतर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी शहरात मोठ्या खासगी शाळा, पाळणाघरे उपलब्ध झाली होती. परंतु मागील वर्षापासून करोना संसर्गामुळे मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे.

शाळा चालवण्यासाठी लागलेली गुंतवणूक व इतर खर्च न पेलल्याने जवळपास साठ ते सत्तर टक्के शाळा बंद पडल्या आहेत. तर काही शाळा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. शाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ठिकाण व त्यांचे भाडे नपरवडणारे असल्याने हा निर्णय घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

शाळाचालकांची गुंतवणूक पाण्यात
शाळा सुरू करण्यासाठी लागणारी साधनसामग्री तसेच शिक्षक, जागा यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवावा लागला आहे. परंतु करोनामुळे मागील वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे भाड्याच्या जागेतील शाळेचे भाडे जागा मालकांना देणे देखील अशक्‍य होत आहे. त्यामुळे बहुतांश शाळाचालकांनी आपल्या शाळा बंद केल्या आहेत तर काहींनी विकण्यास काढल्या आहेत. त्यामुळे शासनाने यांचा विचार करावा, अशी भावना शाळाचालकांनी व्यक्‍त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.