पुणे : गुजरात दंगलीवर एका पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकाला ‘द काश्मीर फाइल्स’इतकीच प्रसिद्धी दिली जावी, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी म्हटलं.
या मुद्द्यावरून शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या अन्य नेत्यांवर निशाणा साधला. विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट पाहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
“मी द काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिला नाही. पण बरेच लोक त्याबद्दल बोलत आहेत. पण काश्मीर फाइल्सच्या आधी पत्रकार राणा अयुब यांचे गुजरात फाइल्स (अॅनाटॉमी ऑफ कव्हर-अप) हे पुस्तकही आहे.
शिंदे यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पंतप्रधान आणि इतर लोक द काश्मीर फाईल्सचा प्रचार करत आहेत, त्यांनी गुजरात फाईल्सबद्दलही बोलायला हवे.” कोणत्याही घडामोडींचा विपर्यास करणे चुकीचे असल्याचे शिंदे यांनी म्हटलं. अशा प्रकारे जनतेच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न ही भाजपची जुनी रणनीती असल्याचा आरोपही त्यांनी केला.