इंग्लंड – जुने-पुराणे निकामी झालेले स्मार्टफोन्स, वापरात नसलेले अथवा आऊटडेटेड झालेले कॉम्प्युटर, हेडफोन्स, जुने सीडी प्लेअर, व्हिडीओ गेम्स अशी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या घरातील पोटमाळ्यावर वर्षानुवर्षे धूळखात पडलेली असतात. मात्र जर तुम्हाला कोणी असे सांगितले की, तुम्ही ज्याला भंगार समजताय ते प्रत्यक्षात सोनं आहे सोनं!! विश्वास बसणार नाही ना? मात्र ही सोशल मीडियावर व्हायरल झालेली कोणती अफवा नसून हे १०० टक्के सत्य आहे.
ब्रिटिश सरकारच्या मालकीची असलेल्या रॉयल मिंट या मौल्यवान धातूंच्या वस्तू बनवणाऱ्या कारखान्याने नुकतीच एक घोषणा करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. रॉयल मिंट लवकरच एक असा कारखाना उभारणार आहे जिथे भंगारात टाकलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून वापरण्यात आलेलं सोनं व इतर मौल्यवान धातू वेगळे केले जातील.
विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मौल्यवान धातू वेगळे करण्यासाठी या प्रक्रियेमध्ये स्मेल्टर्स प्रमाणे उच्च तापमानाची गरज नसून ही प्रक्रिया सामान्य तापमान असताना करणे शक्य आहे. टाकाऊ स्मार्टफोन्स, लॅपटॉप सर्किटबोर्डमधून सोने वेगळे करण्याच्या या प्रक्रियेला ‘पेटेंटेड न्यू केमिस्ट्री’ असं नाव देण्यात आलं आहे. या प्रक्रियेचे पेटंट कॅनडातील एका कंपनीच्या नावावर आहे.
काही सेकंदात होणार ‘सोने का सोना’
रॉयल मिंटने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेद्वारे उपकरणांमध्ये वापरलेलं ९९ टक्के सोनं अथवा इतर मौल्यवान धातू वेगळे काढता येऊ शकतात. थेट धातूला लक्ष्य करून हे काही सेकंदांमध्ये सध्या करता येत.
शेकडो किलो सोनं काढलं जाणार
रॉयल मिंट उभारणार असलेल्या या कारखान्यात दर आठवड्याला ९० मेट्रिक टन सर्किट बोर्डवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यातून दरवर्षी शेकडो किलो सोनं काढलं जाईल.
कारखाना उभारणीचे काम २०२३ मध्ये पूर्ण झाल्यानंतर येथे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात येईल.