पुणे – भामा-आसखेड आणि खडकवासला धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत शनिवारी चांगलीच कालवा कालव झाली. पुणेकरांना पुरेसे पाणी मिळत नाही.
काही भागात अर्धा तास काही भागात दोन दोन तास पाणी दिले जाते. त्यामुळे महापालिकेची समान पाणी योजना तातडीनं पूर्ण करावी तसेच सर्व शहराला समान पाणी मिळावे अशी मागणी करत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत खासदार गिरिश बापट यांनी सभात्याग केला. त्यानंतर सर्व पक्षीय आमदारांनी खासदार बापट यांच्या भूमिकेला पाठींबा देत पुणेकरांना समान पाणी मिळावे अशी मागणी लावून धरली.
खडकवासला आणि भाम-आसखेड कालवा समितीच्या बैठकीत शहराच्या तसेच जिल्ह्यातील पाण्याच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार होता. ही बैठक सुरू झाल्यानंतर महापालिकेत प्रशासक नेमण्यात आल्या पासून शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून शहरात जाणून बुजून प्रशासन असमान पाणी वाटप करत असल्याचा समज निर्माण झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
त्यावर महापालिका प्रशासनाने खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासन समाधानकारक माहिती देत नसल्याने तसेच पाण्याचे नियोजन चुकीच्या पध्दतीने होत असल्याने शहरात समानपाणी वाटप न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत बापटांनी सभात्याग केला. त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनीही महापालिका हडपसर भागात केवळ अर्धा तास आणि ते सुध्दा कमी दाबाने पाणी देत असल्या बाबत नाराजी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्रीही संतापले ..
दरम्यान, या बैठकीत महापालिकेस भामा-आसखेड धरणातून दररोज 200 एमएलडी पाणी उचलण्यास मुभा असताना केवळ 135 एमएलडीच पाणी घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका पूर्ण पाणी का घेत नाही अशी विचारणा केली असता उर्वरीत पाण्यासाठीच्या जलवाहीन्या टाकण्याचे काम झाले नसल्याचे सांगण्यात आले.
यावेळी पवार यांनी जलवाहीनीचे काम होई पर्यंत हे उर्वरीत 165 एमएलडी पाणी उचलून हडपसरला द्यावे अशा सूचना केल्या. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसे करता येणार नाही हे पाणी वडगाव विधानसभा मतदारसंघासाठी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपमुख्यमंत्रीही संपातले. इथ नागरिकांना पिण्याला पाणी नाही. तुम्ही नियम कसले सांगता असे सुनावत भामा- आसखेडचे जादा पाणी हडपस परिसराला देता येईल का याची चाचपणी तातडीनं करण्याचे आदेश दिले.