मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशीपासून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. कारण बँकिंग,सोने दरवाढीसह नागरिकांना वीजदरवाढीचा झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात मोती वाढ केली असल्याचे समोर आले आहे.
महावितरण कंपनीने आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी हा भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे. घरघुती वीजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, या दरवाढीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडसह , बेस्ट, अदानी आणि टाटा पावर या कंपन्यांचा समावेश आहे. MSEDCL च्या ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ झाली आहे.
तर बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत. टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के तर 2023-24 साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.
सध्या राज्यात उन्हाळा चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्यानं वीजेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. त्यास्थितीत महावितरणच्या कराराअंतर्गत विजेने कमाल मर्यादा गाठली आहे. परिणामी राज्य सरकारी कंपनीला किमान दोन हजार मेगावॉट वीज बाहेरून खरेदी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळं विजेच्या दरात वाढ करण्यात आली आहे.