येणाऱ्या दहा वर्षात कोण जास्त पैसा कमावणार ? (भाग-१)

नुकत्याच एका आयटी कंपनीमध्ये `गुंतवणूक व अर्थनियोजन आणि तुम्ही’ या विषयावर चर्चासत्रात मला बोलवण्यात आले होते. त्याठिकाणी नुकतेच उच्च शिक्षण घेऊन नोकरीस लागलेले तरूण-तरुणी माझ्यासमोर होते. अनेकजण अत्यंत चांगल्या पगारावर काम करत  असल्याने व वय २२-२८ वयोगटातील या तरुण आणि नव्या गुंतवणूकदारांसमोर मला विषय मांडायचा होता.

चर्चेला सुरवात करतानाच प्रत्येकाला मी एक प्रश्न विचारला – आजपासून दहा वर्षांनी आपल्यापैकी कितीजण आजच्यापेक्षा जास्त पैसे कमावत असतील व जर आज आपण गुंतवणूक केली तर आपली गुंतवणूक पुढील दहा वर्षात किती पैसा कमावेल.

हा प्रश्न विचारल्यानंतर सगळेजण प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. मी मात्र प्रत्येकाला गुंतवणूक या विषयाकडे घेऊन जाण्याचा प्रवास सुरु केला. या सर्व तरुणतरुणींना सल्ला दिला, जर आपण आपल्या संस्थेत मन लावून, सगळे कौशल्य पणाला लावून काम केले तरी पुढ्च्या दहा ते पंधरा वर्षात आजच्या पगाराच्या कितीपट पैसे कमावू शकणार आहात. कदाचित पगारातील वाढ ही ५० ते १०० टक्के होईल पण, जर आपण आज कमावलेला पैसा योग्य अशा गुंतवणूक पर्यायात गुंतवला तर पुढील दहा ते पंधरा वर्षात आपली गुंतवणूक आपल्यासाठी पैसा निर्माण करणार आहे. यालाच मी नेहमी म्हणतो, संपत्ती निर्मिती.

अनेकदा अनेक गुंतवणूकदार पैसे गुंतवण्याआधीच प्रश्न विचारत असतात – सर, या गुंतवणुकीतून किती टक्के व्याज / नफा / परतावा मिळेल आणि नेहमीच मी याचे उत्तर असे देतो की, आपल्याला टक्क्यात व्याज कमावयाचे आहे का, संपत्ती अनेक पटीत कमवायची आहे.

जर आपणांस अनेकपटीत पैसे कमवायचे असतील तर या गुंतवणुकीला सर्वप्रथम दीर्घकालीन मुदत द्यावी लागेल. (दहा ते वीस वर्षे) आणि गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेशी निगडीत असायला हवी. उदा. शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादी.

अनेकवेळा गुंतवणूकदार मुद्दल सुरक्षित ठेवण्याच्या प्रमुख उद्दीष्टामध्ये कोणतीही जोखिम न घेता गुंतवणूक करण्याचे ठरवतात व कमी व्याज अथवा परतावा स्वीकारतात आणि असे करत असताना निवडत असलेले पर्याय यातही नकळत जोखिम पदरात पाडून घेतात आणि अशा पर्यांयात अनेकवेळा आपले मुद्दल घालवून बसतात.

पारंपारिक गुंतवणूक पर्यायांमध्येही जोखिम निश्चित आहे. बदलत्या काळात अनेक गुंतवणूक पर्यायांमध्ये सातत्याने जोखिम वाढतच आहे. परंतु गुंतवणूकदारांना याचे भान आणि ज्ञान नाही.त्यामुळे डोळे बंद करून गुंतवणूक करत राहणे व नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते.

ठेवी (बँका / खासगी संस्था. जमीन, सोने इत्यादी पर्याय सुरक्षित मानून गुंतवणूकदार यात गुतंवणुकीस सुरवात करतात आणि अत्यंत कमी परतावा स्वीकारतात. परंतु याचसोबत या गुंतवणूक पर्यायात निर्माण झालेली जोखिम नजरेआड होते.

पीएमसी बँक, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, लक्ष्मीविलास बँक अशा अनेक बँका व पतसंस्था यामध्ये गुंतवणुकदारांच्या ठेवी परत कधी मिळणार या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीएचएफएल, इंडिया बुल्स, डी. एस. कुलकर्णी इत्यादी अशा खासगी संस्थांच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या दोन वर्षात अनेक बांधकाम व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आले आहेत. गुंतवणूकदारांचे विकत घेतलेले फ्लॅट, दुकाने  ताब्यात मिळालेली नाहीत, ज्या गुंतवणूकदारांनी घेतलेली घरे व दुकाने पुन्हा बाजारात विकणे आज अवघड बनले आहे. गेल्या पाच वर्षात या गुंतवणुकीतून फार मोठा नफा व परतावा मिळालेला नाही व गुंतवलेले मुद्दलदेखील अडकून बसलेले आहे.

येणाऱ्या दहा वर्षात कोण जास्त पैसा कमावणार ? (भाग-२)

जर गुंतवणूकदार एखाद्या बँकेत ठेवीमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानत असेल व त्यावर ६  ते ८ ट्क्के व्याज घेणे त्याला मान्य असेल तर त्याच्याकडे पुढील दहा ते १५ वर्षांचा कालावधी गुंतवणुकीसाठी असेल तर त्याने त्याच बँकेच्या शेअर्समध्ये ठेवीत पैसा न ठेवता गुंतवला तर निर्माण झालेला परतावा खूपच मोठा असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.