पुणे – इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान पुणे महापालिकेत येणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, ही चर्चा जाणीवपूर्वक घडवली जात असून, या चर्चेतील दावा खोडत काढत; “महापालिकेत 1961 मध्ये तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. तसेच त्यांनी सभाही घेतली होता,’ असा खुलासा कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वीरेंद्र किराड यांनी केला आहे.
किराड यांचे काका रोहिदास किराड हे महापौर असताना पंडित नेहरू हे पुणे महापालिकेत आल्याचे फोटोच किराड यांनी समोर आणत पंडित नेहरू यांच्या पुणे मनपा भेटीला उजाळा दिला आहे. पुणे मेट्रोचे उद्घाटन तसेच विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 मार्च रोजी पुण्यात येत आहेत. या दौऱ्यात त्यांना विरोध करणार असल्याचे कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटले आहे. त्याचवेळी पंतप्रधान पहिल्यांदाच महापालिकेत येत असल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करत असून, पुण्यासाठी ही बाब गौरवास्पद असल्याचे ते सांगत आहेत. मात्र, पंतप्रधान पालिकेत पहिल्यांदाच येत नसल्याचा दावा किराड यांनी केला आहे. किराड म्हणाले, “माझे काका रोहीदास किराड हे महापौर होते. त्यावेळी 1961 मध्ये पानशेतचा पूर आला होता. ती हानी पाहण्यासाठी नेहरू पुण्यात आले होते. यानंतर त्यांनी महापालिकेत सभाही घेतली होती. याचे फोटो आमच्याकडे आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे महापालिकेत येणारे पहिले पंतप्रधान असल्याचा दावा चुकीचा आहे.’
1961 पूर्वीही आले होते पंडित नेहरू
मा. प. मंगुडकर यांनी लिहिलेल्या “आठवणीतील पुणे’ पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू हे दि. 5 जून 1960 रोजी पुणे महापालिकेत येऊन गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी वा. ब. गोगटे हे महापौर होते. दि. 26 जानेवारी 1960 रोजी विश्रामबाग वाडा येथील महापालिकेचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. त्याच्या 5 महिन्यांनी पंतप्रधानांनी ही भेट दिल्याचे यावरून सांगण्यात येत आहे.