पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील फक्त निवासी झोनमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दि.31 डिसेंबर 2020 पूर्वीची गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेली बांधकामे नियमित करता येणार आहेत. त्यासाठी दि.31 मेपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अटी, शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
राज्य शासनाने गुंठेवारी अधिनयम 2001 मध्ये अलिकडेच सुधारणा केल्या आहेत. पीएमआरडीएने त्यामुळे आपल्या हद्दीतील गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत स्थापत्य अभियंतामार्फत अर्ज दाखल करावे लागणार आहे. या निर्णयाचा फायदा प्राधिकरणाच्या हद्दीतील सुमारे 700 पेक्षा अधिक गावांमधील अनधिकृत बांधकामांना होणार आहे.
ही आहेत आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा, दि.31 डिसेंबर 2020 पूर्वीचा कर संकलनाचा दाखला, वीजबिल, स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्थैर्य प्रमाणपत्र दाखला (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट), मोजणी नकाशा, इमारतीच्या उंचीचा दाखला (एलिव्हेशन सर्टिफिकेट), जागेवरील बांधकामांची स्थिती, व्यापी, मजले दर्शविणरे मिळकतींचे तारखेसह छायाचित्र.
व्यवहार सोपे होणार
नियमितीकरण केल्याने अनधिकृत बांधकामधारकांना भविष्यकाळात खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अधिकृतता राहणार आहे. तसेच कर्ज प्रकरणे, तारण व्यवहार आदी बाबी सुलभ होणार आहेत. गुंठेवारी नियमितीकरण करण्याकरिता प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या नियमितीकरणाचा फायदा घ्यावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
या क्षेत्रांत असलेली अनधिकृत
बांधकामे नियमित होणार नाहीत
रेड झोन, बफर झोन, हिल टॉप हिल्स स्लोप झोन, शेती तथा ना-विकास झोन, वनीकरण झोन, शासकीय/खासगी वने, प्रादेशिक योजनेतील तसेच प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते व आरक्षणे, नदी पात्र, सरकारी जागा आदी झोनमधील बांधकामे पीएमआरडीएने नियमितीकरणातून वगळली आहेत. त्यामुळे येथील बांधकामे नियमित होणार नाहीत.
पुणे महापालिकेत समाविष्ट
झालेल्या 23 गावांनाही फायदा
सदर गुंठेवारी नियमितीकरण हे प्रामुख्याने प्राधिकरणामार्फत प्रसिद्ध करण्यत आलेल्या प्रारुप विकास योजनेतील दाटीवाटीचे क्षेत्र (कन्गेस्टेट झोन), 1997 मधील प्रादेशिक योजनेमधील निवासी झोन आणि पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांतील गावठाण क्षेत्रामधील रहिवास बांधकामांसाठी लागू आहे. त्यामुळे शेकडो घरे आता नियमितीकरणाच्या उंबरठ्यावर आली आहेत.