पालिकेची सुरक्षा करतंय कोण?

किती सुरक्षारक्षक कामावर? प्रशासनालाच नाही माहिती

पुणे – महापालिकेची सुरक्षा कोणत्या व्यक्ती करत आहेत, याची महापालिका प्रशासनालाच माहिती नसल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका मुख्य इमारत आणि महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या 500 आस्थापनची सुरक्षेची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांवर आहे, त्या कर्मचाऱ्यांची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही. तसेच अनेक ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले सुरक्षा रक्षक जागेवर नसल्याने महापालिका आस्थापनाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहर परिसरात महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या आखत्यारित 500 ते 600 आस्थापना येतात. या आस्थापनची सुरक्षा व्यवस्थेचे काम मे. सैनिक इंटिलिजन्स अँड सिक्‍युरिटी प्रा. लि. या संस्थेला देण्यात आली आहे. शहर परिसरात महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेच्या अखत्यारित 500 ते 600 आस्थापना येतात. या अंतर्गत महापालिका इमारत, नाट्यगृहे, क्षेत्रीय कार्यालये, सरकारी शाळा, पाण्याच्या टाक्‍या, कियोस, उद्याने, शहरातील पुतळे, यांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेच्या सुरक्षा विभागाची आहे.

या विभागात कंत्राटी पद्धतीने सुमारे 1,700 ते 1,800 सुरक्षा रक्षक काम करतात. या संस्थेमार्फत सुरक्षा व्यवस्थेसाठी 1,350 कर्मचारी महापालिकेला पुरवण्यात येतात. मात्र या संस्थेकडून पुरवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती महापालिकेला देण्यात आली नाही. अनेकदा मागणी करूनही ती देण्यात आली नसल्याची माहिती संबंधित विभागातील सूत्रांकडून मिळाली.

एवढेच नव्हे, तर काही कर्मचारी कामाच्या ठिकाणी जातच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेची आस्थापनाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्‍न चिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित संस्थेला त्यांच्याकडून पुरवण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे, मोबाइल क्रमांक, त्यांच्या कामाचे ठिकाण, त्यांना देण्यात आलेले कार्यादेश आणि पोलीस पडताळणी लवकरात लवकर सादर करावी असे पत्र महापालिका सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.