आपल्यापैकी फुटलं कोण?

 

भाजप-शिवसेनेकडून सातारा लोकसभेच्या मतदानाचा आढावा
आगामी विधानसभा निवडणुकीतील धोका टाळण्याचा प्रयत्न

सम्राट गायकवाड

रिपोर्ट येताच दांड्या गुल

लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यातील माढा आणि सातारा मतदारसंघात पक्षाशी अप्रामाणिक राहिलेले पदाधिकारी व स्वयंघोषित नेत्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येत आहे. त्यासाठी बुथ निहाय मतदानाची माहिती घेण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर निवडणूक कालावधीत विरोधी पक्षाच्या संपर्कात राहिल्याचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सर्व माहिती प्राप्त होताच ते पदाधिकारी आणि स्वयंघोषित नेत्यांच्या दांड्या गुल होणार आहेत.

माण-खटाव अन्‌ फलटणचा शोध

माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत युतीकडून फलटणचा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला. एवढेच नव्हे तर माण-खटावमधून कॉंग्रेसच्या विद्यमान आमदारांनी अप्रत्यक्ष पाठिंबाही जाहीर केला. असे असताना फलटण आणि माण-खटावमधून युतीचे विजयी उमेदवार खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांना अपेक्षित मताधिक्‍य मिळू शकले नाही. त्याचाही शोध घेण्याचे काम सध्या भाजप आणि सेनेकडून सुरू असल्याचे दिसून येते. 

सातारा  – मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत यंदाची सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार आणि चुरशीची झाली. दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत खा. उदयनराजेंचे मताधिक्‍य घटविण्यात भाजप-सेनेला यश मिळाले. मात्र, तरीही आगामी विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोका टाळण्यासाठी सध्या दोन्ही पक्षाकडून बुथनिहाय मतांची आणि त्या निमित्ताने परिसरातील नेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे.

सन 2014 च्या निवडणुकीत खा. उदयनराजेंचा तब्बल 3 लाख 67 हजार मतांनी विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत मताधिक्‍क्‍यात घट होत ते 1 लाख 32 हजार मतांनी विजयी झाले. साहजिकच त्यामागे केंद्रात व राज्यात युतीचे सरकार आणि खा. उदयनराजेंच्या कामगिरीबाबत थोड्याफार प्रमाणात नाराजी असल्याचे कारणे होती. या सर्व मुद्द्यांची गोळाबेरीज करून युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना तब्बल साडे चार लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. मात्र एवढी मते मिळून देखील पाटील यांना विजय प्राप्त करता आला नाही.

विजयी होण्यासाठी पाटील यांना राजकीय गणितानुसार 66 हजार मते कमी पडली. नेमक्‍या या मतांचा आढावा घेण्याचे काम भाजप व शिवसेनेकडून सुरू आहे. आढाव्यामध्ये, निवडणूक कालावधीत काही पदाधिकारी मतदारसंघ सोडून परगावी गेल्याचा मुद्दा अग्रस्थानी आहे. काही ज्येष्ठ नेते थेट राष्ट्रवादीच्या संपर्कात राहिल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तर काही पदाधिकाऱ्यांनी व सत्तेचा लाभ घेणारे प्रचारात सहभागीचे झाले नव्हते, अशा सर्व बाबींचे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, एक बुथ.. 25 युथ संकल्पनेची कितपत अंमलबजावणी झाली? याची माहिती बुथनिहाय झालेल्या मतदानाद्वारे घेतली जात आहे.
त्याचाच परिणाम सध्या सातारा नगर पालिकेतील भाजपच्या स्विकृत नगरसेवक निवडीवर होताना दिसून येत आहे. शहरातील ज्या बुथवर युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मतदान झाले. त्याच बुथ परिसरातील नेत्याला स्विकृत नगरसेवक करण्याचा मुद्दा सध्या पुढे करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांतील मतदानाबरोबर विद्यमान पदाधिकाऱ्यांचे रिपोर्ट कार्ड देखील तयार करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीतील अनुभव आगामी विधानसभा निवडणुकीत येता कामा नये, यासाठी भाजप आणि शिवसेना जागरूक होताना दिसून येत आहे. देशात पुन्हा एकदा बहुमताची सत्ता आल्यामुळे आता राज्यातही घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून नियोजन करण्यात येत आहे. त्या यशामध्ये सातारा जिल्ह्याचा वाटा असलाच पाहिजे, यासाठी जिल्ह्यातून अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा आराखडा करण्यात आला आहे. त्याचे सांकेतिक उदाहरण लोकसभा निवडणुकीदरम्यानच दिसून आले.

जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर निकालानंतर अनेक दिग्गज नेते भाजप-सेनेच्या संपर्कात असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. अशा परिस्थितीत दिग्गज नेत्यांचा भाजप-सेनेत प्रवेश झाला तर जिल्ह्यात युतीला अच्छे दिन निश्‍चितपणे येणार आहेत. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे स्वकीयांकडूनच घात होवू नये, यासाठी भाजप-सेनेने आढाव्याच्या निमित्ताने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.