स्मार्ट कार्ड योजनेसाठी सात हजार प्रवाशांचे अर्ज

सातारा – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा फायदा प्रवाशी घेत असतात. तरीही या योजनेचा गैरफायदा घेण्याच्या घटनात वाढ झाली असून ती थांबविण्यासाठी ज्येष्ठांसह विद्यार्थ्यांसाठी एकच कार्ड वापरात आणले जावे म्हणून 1 जूनपासून स्मार्ट कार्डची योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी जानेवारी महिन्यातच नावनोंदणी सुरू करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत 11 डेपोपैकी 6 डेपोत 7829 एवढ्या प्रवाशांनी अर्ज दाखल केले आहेत.

सर्वसामान्यांची लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी अनेक योजना तयार करण्यात आल्या आहेत. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात पास, ज्येष्ठांसाठी अर्ध्या तिकिटाची सोय, दिव्यांगांसाठी सवलत देण्यात येत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून एसटीच्या प्रवास सुखकर वाटत आहे. परंतु या सवलतीचा फायदा घेताना काही प्रवाशी याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न वारंवार करत असतात. याला आळा बसण्यासाठी एसटी महामंडळाने 1 जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वित केली आहे. एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी एकच स्मार्ट कार्ड तयार करण्यात आली आहे.

या कार्डतर्फे ज्येष्ठ, द्विव्यांग, विद्यार्थी यांचा सर्व डेटा फिड असणार आहे. त्यांच्या सवलतीनुसार तो पास तयार करून दिला जाणार आहे. हातानी लिहून विद्यार्थ्यांना पास दिले जायचे ते बंद होणार आहेत. तसेच ज्येष्ठांना आधार कार्ड, पॅनकार्ड याच्या आधारावर हाफ तिकिट दिले जायचे ते ही बंद होणार आहे. स्मार्ट असेल तरच प्रवासादरम्यान सवलत दिली जाणार आहे.

यामुळे येत्या जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सातारा डेपोत 2527 अर्ज, कोरेगाव डेपो 1553, वाई 1583, महाबळेश्‍वर 839, मेढा 1084, पारगाव खंडाळा 243 अर्ज भरण्यात आले आहेत. हे काम 11 डेपोच्या ठिकाणी सुरू झाले आहे. या स्मार्ट कार्डमध्ये 100 रूपयांचा रिचार्ज केल्यास अधिक 5 रूपये मिळणार आहेत. जेवढी जास्त रिचार्जची रक्कम असेल तेवढी 5 रूपयांनी अधिक रक्कम मिळणार आहे. तसेच ही संख्या आणखी वाढणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.