माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट बिकट

पुरंदर तालुक्‍यात दिवे घाट रस्ता, पुलांची कामे अर्धवट

– एन.आर.जगताप

सासवड – आळंदी येथून आज माऊलींच्या पालखी सोहळ्याने पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. लोखो वारकऱ्यांचा मेळा शुक्रवारी (दि.28) दिवे घाट ओलांडून पुरंदर तालुक्‍यात प्रवेश करेल. परंतु, यंदा माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट काहीशी बिकट असणार आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या दिवे घाटातील धोकादायक दरडींवर लोखंडी जाळ्या किंवा सिमेंट अस्तरीकरणाचा प्रस्ताव असताना यापैकी कोणतेच काम झालेले नाही.

त्यातच पावसाची भुरभुर सुरू झाल्यास अशा कालावधीत घाटात छोट्या-मोठ्या दरडी कोसळण्याचा धोका आहे. यासह या पालखी महामार्गाचे काम गेल्या चार-पाच वर्षांपासून रेंगाळले असून अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. सासवड पासून जेजुरी पर्यंतच्या टप्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ता खोदून ठेवण्यात आला असून अनेक ठिकाणी पुलांची कामेही अर्धवट अवस्थेत आहेत. यासह पालखी सोहळ्यास पाणीटंचाईचीही झळ बसण्याची चिन्हे आहेत. याबाबत “प्रभात’ने घेतलेला विशेष आढावा….

आळंदी ते पंढरपुर पालखी महामार्गावरील पुरंदर तालुक्‍यातील दिवे घाट हा संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात कठीण व चढाईस अवघड असा टप्पा. या घाटातून पालखीचे प्रस्थान होत असताना दिवे घाटात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. रस्त्यालगत असलेल्या घाटातील डोंगरकडा दुभंगलेल्या स्थितीत असुन त्यावर लोखंडी जाळ्या किंवा सिमेंट अस्तरीकरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीस या कडा कोसळण्याचा धोका आहे. दिवे घाटाची पाहणी करून याबाबत आवश्‍यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन उपाय करण्याबाबत बांधकाम विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असताना या विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही. पावसाळ्यापूर्वी नियमानुसार दरडी प्रतिबंधक ऑडिट करून घाटात सुरक्षा यंत्रणा पुरविणे हे या विभागाचे काम आहे, त्यातच पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभुमीवर विशेष काळजी घेणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. पुणे-पंढरपूर या राष्ट्रीय पालखी महामार्गावरून पालखी सोहळाच नव्हे तर मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, केतकावळे, भुलेश्‍वर आणि किल्ले पुरंदर येथे जाणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्याही मोठी आहे. याच कारणातून दिवे घाटात सातत्याने वर्दळ असते, ही बाब लक्षात घेऊन घाटातील दरडींबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

अरूंद पुलाचे काम अर्धवट…
पुणे-पंढरपुर पालखी मार्ग पुर्वी राज्य शासनाच्या अख्यत्यारित होता. मात्र, महामार्ग क्र. 965 म्हणुन हा रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे. परंतु, सहा-सात वर्षानंरतही या रस्त्याचे काम रखडले असून अनेक ठिकाणी पुलांची कामे रखडलेली आहेत. सासवड येथे कऱ्हानदीवरील पुलाचे काम रखडल्याने रस्ता अरूंद झाला असून पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी जाताना येथे मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. अरूंद पूल असल्याने चेंगराचेंगरीचीही शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, सदर पुलाचे काम पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी वारकरी सांप्रदायातूनही बांधकाम खात्याकडे करण्यात आली होती. परंतु, प्रशासकीय कारभारात सापडल्याने या मार्गाच्या रुंदीकरणासह देखभाल, दुरुस्तीसह पुलांची कामेही रखडली आहेत.

खळद येथे रस्ता पूर्णत: उखडला आहे. या पुलावरून पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकऱ्यांचा सोहळा जात असतो. पुल अरूंद तसेच पुलाखाली खोल नदीपात्र असल्याने सोहळा प्रशासनालाही काळजी घ्यावी लागणार आहे. येथे नवीन पूलाचा अर्धवट सांगाडा कित्येक वर्षांपासून तसाच आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्‍वभुमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य शासन, केंद्र शासन यापैकी कोणत्याही प्रशासनाकडून याबाबत दखल घेतली गेलेली नाही.

प्रशासनापुढे पाणी टंचाईचे संकट…
संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा आषाढी वारीनिमित्त दि .28 जूनला दोन दिवसांच्या मुक्कामी सासवडला येत आहे. दि. 28 जून ते 1 जुलै या कालावधीत पालखी सोहळा पुरंदर तालुक्‍यात असणार आहे. या कालावधी दरम्यान सोहळा व्यवस्थापन समितींपुढे पाणी टंचाईचे मोठे संकट आहे. सध्या, सासवड शहरास दोन दिवसांआड वीर योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. गराडे व घोरवडी येथील पाणी सासवडला बंद झाले आहे. घोरवडी धरणात असणारा पाणीसाठा अल्प असल्यामुळे सासवड परीसरातील 15 विंधन विहीरी अधिग्रहीत करून त्यावर टॅंकर भरण्याची व्यवस्था सासवड नगरपरिषदेने केली आहे. परंतु, पालखी सोहळ्याच्या दोन दिवसांच्या कालावधीत किमान दीड हजार टॅंकर भरण्याची व्यवस्था नगरपरिषदेस शक्‍य नाही. वीर योजनेचे पाणी देणेही शक्‍य होणार नसल्याने वारी मुक्कामात यावर्षी पहिल्यांदाच पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. जेजुरी नगरीतही पालखी एक दिवस मुक्कामी आहे. या काळात साधारण 1200 टॅंकर पाण्यासाठी येत असतात. नाझरे धरणाने तळ गाठल्याने जेजूरीस चार दिवसाआड मांडकी डोह योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. तसेच जेजूरी येथे अधिकचे टॅंकर भरण्यासाठी एमआयडीसी योजनेतून सुविधा केल्यास टॅंकर भरण्यास सोईस्कर जाऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.