- सभापतीपदासाठी आज होणार निवडणूक
पिंपरी – महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापतीपदासाठी आज (शुक्रवारी) दुपारी बारा वाजता निवडणूक होणार आहे. या सभापती निवडणुकीवरून सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी भाजपकडून सभागृह नेते नामदेव ढाके यांनी भाजप सदस्यांना व्हीप बजावला आहे. स्पष्ट बहुमतामुळे लांडगे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. त्यात भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 असे संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपकडून आमदार महेश लांडगे समर्थक नितीन लांडगे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रवीण भालेकर हे उमेदवार आहेत. भाजपमध्ये रवी लांडगे, शतुघ्न काटे हे सभापतीपदावरून नाराज झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने सांगली पॅटर्न राबविण्याचा दावाही केला आहे. दरम्यान, स्थायीत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. सर्व सदस्यांना पक्षनेते नामदेव ढाके यांनी निवडणुकीत हजर राहून भाजप उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप बजावला आहे.