अनुराग-तापसीची झाडाझडती सुरूच

मुंबई – कर चुकवेगीरी प्रकरणी दिग्दर्शक अनुराग कश्‍यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. अनुराग व तापसीसह फॅंटम फिल्म प्रॉडक्‍शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. बुधवारी (3 मार्च) रात्री उशिरापर्यंत अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आली. तसेच काल दुपारपासून सुरू असलेली मालमत्तांची झाडाझडती अजूनही सुरूच आहे.

फॅंटम फिल्मशी संबंधित सेलिब्रेटींच्या मालमत्तांवर आयकर विभागाने बुधवारी (3 मार्च) छापे टाकले. मुंबई, पुण्यासह एकूण 30 ठिकाणी छापे टाकले. यात फॅंटम फिल्मसह टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयावरही आयकरने धाड टाकली. काल दुपारपासून आयकरचे पथक या मालमत्तांची आणि कर चोरी प्रकरणाचा तपास करत आहेत.

आयकर विभागाने बुधवारी अनुराग कश्‍यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूची जवळपास सहा तास चौकशी केली. आयकर विभागाकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारावर अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आली. त्यांना झालेला नफा आणि त्यांनी भरलेला आयकर परतावा याच्यात आयकर विभागाला तफावत आढळून असून, पुढील तीन दिवस झाडाझडती सुरूच राहणार असल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.