हडपसर : वेताळ बाबा वसाहत येथे नविन कालव्याची भिंत खचली; कालवा फुटून मोठी दुर्घटना घडण्याची भीती

– विवेकानंद काटमोरे
पुणे – हडपसर परिसरातून वाहणाऱ्या नविन मुळा- मुठा कालव्याची भिंत कोसळली असून पूर्णक्षमतेने वाहणारा कालवा फुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील वेताळ बाबा वसाहत येथे गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कालव्या शेजारील डांबरी रस्त्यासह दगडी संरक्षक भिंत कालव्यात कोसळली आहे.कालवा असाच भरून वाहील्यास तो फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेजारीच वेताळ बाबा वसाहत मध्ये शेकडो कुटुंब राहत आहेत. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.

बकाल, भयाण अवस्थेत सध्या शहरातील सर्वच कालव्यांच्या भिंती आहेत. प्रशासनाकडे या कालव्याच्या दुरुस्ती, डागडुजी विषयी अनेकदा तक्रार केल्या; परंतु त्याकडे पाटबंधारे विभागाचा काणाडोळा होत आहे. या दुर्लक्षाचा परिणाम गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वेताळ बाबा वसाहत येथे पाहायला मिळाला.

वेताळ बाबा वसाहत मध्ये ये – जा करण्यासाठी कालव्या लगत दहा ते बारा फुटांचा डांबरी रस्ता आहे. कालव्याच्या संरक्षक भिंत आणि सुरक्षा लोखंडी जाळीसह या रस्त्याचा काही भाग, लोखंडी जाळी आणि दगडी संरक्षक भिंत कालव्याच्या वाहत्या पाण्यात पडली आहे. सुमारे पन्नास ते साठ फुटांचा भाग कालव्यात कोसळला आहे.

त्यामुळे भविष्यात मोठा अपघात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित कालव्याच्या भिंतीची परिस्थिती गंभीर आहे. वेताळ बाबा वसाहतीतील नागरिकांच्या जिवाला भविष्यात धोक्याला सामोरे जावे लागेल, अशी अवस्था तेथील कालव्याची आहे. आम्हालाही आता भीती वाटते दांडेकर पुलाजवळील वस्तीमध्ये जी घटना घडली तशी आमच्या भागात होईल की काय, याची भीती वाटू लागली आहे. आमच्या इथून जो नवीन मुळा मुठा कालवा वाहतो त्याच्या संरक्षक भिंतीची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यातच आज रात्री डांबरी रस्त्यासह भरावाची भिंत खचली आणि पडली आहे.

याकडे दुर्लक्ष केले तर कोणत्याही क्षणी कालवा फुटून व वस्तीती पाणी शिरून मोठी दुर्घटना घडेल अशी भिती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये पर्वती येथे जनता वस्तीमध्ये ज्या पद्धतीने दुर्घटना घडली ती जर आमच्या वसाहतीमध्ये घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.

वेळेवर दुरुस्तीची कामे केल्यास अपघाताचा धोका कमी होईल. विशेष म्हणजे, यापूर्वी अनेकदा पाटबंधारे खात्याकडे तक्रार करून देखील त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. कालव्याच्या भिंतीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. आम्हा नागरिकांच्या जिवाचा धोका टळलेला आहे, असे वाटत नाही. संकट कधीही येऊ शकते. प्रत्यक्षात कालव्यांची स्थिती दयनीय आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.