पुणे – गणपती मुर्ती विक्री स्टॉलवरील 50 हजाराची रोकड चोरताना एका महिलेला नागरिकांनी रंगेहाथ पकडले. मात्र तीच्या दोन साथीदार महिला गर्दीचा फायदा घेत पळून गेला. पकडलेली महिला 60 वर्षाची असून तीच्याकडून चोरलेल्या रकमेतील पाच हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ही घटना येरवडा येथील ताडीगुत्ता येथे शुक्रवारी घडली.
याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी 33 वर्षीय महिला बिबवेवाडी येथे रहावयास असून तीने गणपती मुर्ती विक्रीचा स्टॉल येरवड्यातील ताडीगुत्ता येथे उभारला होता. गणपती मुर्ती विक्रीतून आलेली 50 हजाराची रोकड तीने स्टॉलवर चादरीखाली ठेवली होती. यावेळी तीन महिला मुर्ती विकत घेण्याच्या बहाण्याने तेथे आल्या होत्या.
बऱ्याच वेळा रेंगाळल्यानंतर त्यांनी काहीच घेतले नाही. त्या तीथून जाताच फिर्यादी महिलेच्या लक्षात आले की, तीच्या चादरीखाली ठेवलेली 50 हजाराची रक्कम दिसत नाही. तीने आरडा ओरडा करताच नागरिकांनी संशयीत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तो पर्यंत तीच्या दोन साथीदार मात्र रोकड घेऊन पसार झाल्या होत्या. ताब्यात घेतलेल्या महिलेकडे पाच हजाराची रोकड सापडली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वारंगुळे करत आहेत.