अहमदाबाद – गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विजय रुपाणी यांनी शुक्रवारी राजीनामा दिला होता. यानंतर आज (शनिवारी) भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गुजरातेत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वीच राज्यात खांदेपालट करण्यात आली आहे. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव चर्चेत होते. मात्र नरेंद्र सिंह तोमर व प्रल्हाद जोशी या केंदीय निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय झाला.
पटेल आज (शनिवारी) राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेणार असून ते त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव मांडतील. यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरवली जाईल.
दरम्यान, रुपाणी हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे भाजपचे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यापूर्वी बी एस येडियुरप्पा यांनी २६ जुलै रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. येथे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी २ जुलैला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून येथे २०२२ ला विधानसभा निवडणुका होतील.